Tuesday, October 29, 2019

अती शहाणा त्याचा बैल रिकामा


ऐका मार्केट देवा तुमची कहाणी एक आटपाट नगर होत.. तिथे तेलाचे साठे, चांदीच्या भिंती, धनाच्या राशी आणि सोन्याच्या खाणी, तिथे कुबेर भरती पाणी. कोणी होतो इथे रावाचा रंक आणि रंकाचा राव. रोजचा दिवस नवा, रोजचा नवा व्यापाराचा डाव.
या नगरात एक शांतीमणी नावाचा राव होता. त्याची स्वतःची पेढी होती, इमाने इतबारे तुमची सेवा करून त्याने अपार धन कमावले. त्याचे काही नियम होते तुम्हीच घालून दिलेले, तो श्रद्धेने त्याचे पालन करी. त्याचा एक मुलगा होता, खूप हुशार उपजत बुद्धिमान, तो खूप शिकला, परदेशी जाऊन आला, खूप शिकून आला. तो वडिलांच्या पेढीवर बसू लागला. 
शांतीमणीने प्रथम त्याला छोटी छोटी कामे सांगितली, अहवाल काढायला, अंक समजायला, ओळखीच्या व्यापरांकडे निरोप द्यायला सांगितले, मुलाचे मन काही रमेना, तो शांतीमणीस म्हणाला, पिताजी मी एवढे शिकून आलो. शहाणपण घेऊन आलो ते काय निरोप्याची कामे करायला? अहवाल मी बनवायचे आणि निर्णय तुम्ही घ्यायचे.. ते काही नाही आता मी व्यापार करणार, मी निर्णय घेणार , मार्केट मध्ये मीच खेळणार. शांतीमणी थोडा खिन्न झाला, तरी वाढत्या शहाणपणापुढे कोणताही तर्क चालत नाही, हे त्याने ओळखले. त्याने बरेचसे धन मुलाकडे दिले आणि म्हणाला मूला तू हे धन घे आणि मार्केट मध्ये जा. तूच निर्णय घे. आणि जेंव्हा धन संपेल तेंव्हा परत माझ्याकदडे ये. मुलगा दुखावला, जोरात रडू लागला व म्हणाला नका नका असे बोलू, धन संपायचा शाप देऊ. शांतीमणी समजावत त्याला म्हणाला मूला  हा शाप नाही वस्तुस्थिती आहे कारण तू मार्केट मध्ये खेळणार म्हणालास .. मार्केट देव आहे त्याची पूजा करावी. त्याला शरण जावं, त्याने घालून दिलेले नियम श्रद्धेने पाळावेत. बाकीच्यांना मदत करावी व त्यांची मदत घ्यावी तरच तुझी प्रगती होईल. मुलगा तात्पुरते हो हो म्हणाला पण त्याच्या मनात काही वेगळेच होते. देव वगैरे काही नसते . मी शहाणा, शिकलेला माझ्या बुद्धीवरच मी जिंकणार.मार्केटला मीच खेळवणार. खरेदी विक्री दोन्ही वर माझीच हुकूमत. नुसता फायदाच फायदा/ पण मार्केट एकट्याने ठरत नहीं, मार्केटचा देव स्वत: काही करत नाहीं. सगळया व्यपर्यांच्या भावना एकावटतात  तेंव्हाच भाव चढतात किंवा उतरतात. सुरवातीला त्याचा व्यापार खुप वाढला, नफा झाला मग शांतिमणिचा मुलगा कोणाला कोणाला जुमनेसा झाला, भावनेत वाहवत गेला. तो तांत्रिक विश्लेषण विसरला, नुकसान रोखायचा नियम विसरला. मार्केट पेक्षा स्वताला शहाणा समजू लागला. मार्केटला  झुकवायच्या वल्गना करू लागला. अणि एक दिवस घात जाला. मार्केट देवाने झटका दिला अणि शांतिमणिच्या मुलाचे मूळ मुद्दल अणि झालेला नफा सगळे साफ़ झाले. चुकीचे व्यापर, अमर्याद जोखिम याने त्याचे कम्बरडेच मोडले. मार्केट पेक्षा स्वताला शहाणा समजणारा बैल पूर्ण रिकामा झाला. 

तो परत शांतिमणि कड़े आला मान तुकवून उभा राहिला अणि म्हणाला पिताजी मी चुकलो. मी तुमचे सगळ धन घालवले आपण आता रस्त्यावर आलो. शान्तिमणि ने त्याला  धीर दिला व् म्हणाला अरे मुला असा रडू नको. तो पुढे म्हणाला मार्केट देवा ने सांगितलेले नियम मी कधीच सोडत नाही. मी तुला देखिल आपल्या धनातला थोडाच भाग दिला होता. काळजी करू नको पुन्हा व्यापार कर पण आज पासून मार्केट देवाचे व्रत घे. शांतिमणिच्या मुलाने विचारले पिताजी हे व्रत कसे करावे. शान्तिमणि म्हणाला मुला मी सांगतो ते नीट आइक. 

शिकलेला धडा विसरु नको, धनाचे २ भाग करावे, एक मार्केट देवाच्या पूजेत लावावा, एक सावधगिरी म्हणून राखून ठेवावा, पूजेत वापरलेल्या भागावर जो प्रसाद मिळेल तो दुसर्या भागात वाढवत ठेवावा. 

धनाचे व्यवस्थापन. तुझ्या मनाचे व्यवस्थापन अणि जोखामिचे व्यवस्थापन या पासून दूर जाऊ नको. तांत्रिक विश्लेष्णाची कास सोडू नको. मार्केट देवापेक्षा शहाणा समजू नको सगळयाना मदत कर सगळयाची मदत घे. उतू नको मातु नको घेतला वसा टाकू नको. मुलाने मनापासून मार्केट देवाला नमस्कार केला शांतिमणिने सांगितलेले व्रत आयुष्यभर पाळले, मार्केट देव त्याच्यावर प्रसन्न झाले  अणि त्याने उत्तरोत्तर प्रगति केली. जसे मार्केट देव शांतिमणिच्या मुलाला प्रसन्न झाले तसे ते तुम्हा आम्हाला प्रसन्न होवोत अणि आपण सगळे प्रगति करो. 

अशी मार्केट देवा तुमची साठा उत्तराची कहाणि "साठे" उत्तरी सुफळ सम्पूर्ण.

 - मंदार सहस्रबुधे

1 comment: